धुळे जिल्हा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून समाजकल्याण विभागामार्फत आज धुळे शहरातून भव्य अशी समता दिंडी काढण्यात आली.
सुरुवातीस छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर तसेच मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
समता दिंडीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सुंदर अशी प्रतिमा ठेवलेला चित्ररथाद्वारे समता दिंडींची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होऊन धुळे शहरातील प्रमुख मार्गांवरुन गुलमोहर विश्रामगृह धुळे आवार येथे पोहचल्यावर व्यसनमुक्ती बाबत शपथ घेवून या दिंडीचा समारोप करण्यात आला.
दिंडीच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्य याबाबत जनजागृती करण्यात येवून सामाजिक न्यायाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच अंमली पदार्थ व्यवसापासून दूर राहण्याचेही आवाहन करण्यात आले.
समता दिंडीत पारिचारीका प्रशिक्षण महाविद्यालय, धुळे, जो.रा.सिटी हायस्कुल, ग्लो उर्दू हायस्कुल, कमलाबाई कन्या हायस्कुल, कै. वसंतराव यशवंतराव घासकडबी महाविद्यालय, धुळे येथील विद्यार्थी, विद्यार्थींनी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठया संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मालसिंग पावरा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य लोक अभिरक्षक ऍड. ज्ञानेश्वर महाजन, इमाव बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक अश्विनी मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार विजेते व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जिरेकर, जोसेफ मलबार, सुरेश बहाळकर, सुरेश लोंढे, श्रीमती नंदिनी सौंदाणकर, मधुकर शिरसाठ, सुभाष कुलकर्णी, शाहिर श्रावण लक्ष्मण वाणी, रामदास जगताप, निवृत्त समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.