धुळ्यात ‘आपदा सखी’ आणि ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण सत्र संपन्न

धुळे जिल्हा

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, धुळे यांच्यावतीने आज जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे ‘आपदा सखी’ आणि ‘आपदा मित्र’ यांचे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या हस्ते सत्राचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, सेफ्टी प्रा. लि. चे ट्रेनर पद्माकर आंबेकर, सुभाष बागवान, राहुल अहिरे, रुक्साना सय्यद आदि उपस्थित होते.


अप्पर जिल्हाधिकारी श्री. बोरकर म्हणाले की, विविध प्रकारच्या नैसर्गिंक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. अशा प्रशिक्षणामुळे आपत्तींना परिणामकारकपणे तोंड देण्यासाठी आवश्यक कौशल्ये व माहिती प्राप्त होते. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन, धुळे यांच्या विद्यमाने धुळे जिल्ह्यात प्रथमच ‘आपदा सखी’व ‘आपदा मित्र’ यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण एकूण बारा दिवसांचे आहे. या बारा दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये सर्व सहभागी स्वंयसेवकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरीकांना करायच्या मदतीबाबत सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी धुळे जिल्ह्यातून एकूण शंभर ‘आपदा सखी’व ‘आपदा मित्र’ उपस्थित आहेत. या बारा दिवसांमध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यात येईल. एखादी नैसर्गिक आपत्ती जर आली तर या आपत्तीला आपण सर्वांनी सामोरे जाण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा विशेष: तरुण वर्गाचा सहभाग अंत्यत महत्त्वाचा असून या प्रशिक्षणात तरुण वर्गाला प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून धुळे जिल्ह्यात कुठलीही आपत्ती आली तरी जिल्हा प्रशासन आणि आपदा मित्र आपत्तीला सक्षमपणे तोंड देतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. बोरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन साहित्याची पाहणी केली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आपत्ती निवारणासाठी प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या साहित्याची तसेच या प्रशिक्षणात आपदा मित्रांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाबाबतही माहिती दिली. या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने ‘आपदा सखी’व ‘आपदा मित्र’उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *