धुळे जिल्हा
राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेतून लाभ घेतलेल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या सहभागातून “लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था”स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मनोज चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासनामार्फत लाडकी बहिण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. अशा महिलांची जिल्ह्यात नागरी सहकारी पतसंस्था नोंदविण्यासाठी 8 मार्च 2019 च्या परिपत्रकातील नोंदणी निकषानुसार संस्था नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येईल.
यात महिलांसाठी महानगर पालिका तसेच वार्ड, प्रभाग कार्यक्षेत्रासाठी सभासद संख्या व भागभांडवल निश्चित केले आहे. तालुका व नगरपालिका कार्यक्षेत्रात स्थापन होणाऱ्या पतसंस्थाकरिता प्राथमिक सभासद संख्या 500 असून नोंदणीच्या वेळी त्यांचे भागभांडवल 5 लाख रुपये आवश्यक आहे. गाव कार्यक्षेत्र असणा-या संस्थासाठी प्राथमिक सभासद संख्या 250 असून नोंदणीच्या वेळी भागभांडवल दीड लक्ष रुपये असणार आहे. जिल्हास्तरावरील संस्थेकरिता प्राथमिक सभासद संख्या 1 हजार 500 असून भागभांडवल 10 लक्ष रुपये आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांचे कार्यालय, प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. चौधरी यांनी केले आहे.