धुळे जिल्हा
आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवराच्या हस्ते चित्ररथाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथास आमदार श्रीमती मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, माजी नगरसेवक सतिषतात्या महाले आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानासाठी देशभरातील सुमारे 63 हजार आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील 4 हजार 975 गावांचा समावेश असून धुळे जिल्ह्यातील 213 गावांचा या अभियानात समावेश आहे. या अभियानाची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या 25 प्राथमिक क्षेत्रे व 17 मंत्रालयांच्या समन्वयाने करण्यात आली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील 213 आदिवासी गावांमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून योजनांची माहिती पोहोचवण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
कार्यक्रमानंतर आयोजित शिबिरांमध्येही आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.