मिल परिसरातील रहिवाशांना हक्काचा सातबारा बंटी मासुळेंच्या पाठपुराव्यामुळेच ! मी फक्त मंत्रालयातून मंजुरी आणली : आ. अनुपभैय्या अग्रवाल

धुळे शहर

मिल परिसरातील सुमारे 20 हजार रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळावा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा बंटी मासुळेंनीच केला. महापालिकेत ठराव करण्यापासून ते नाशिक,पुणे मुंबईपर्यंत कागदपत्रांचा प्रवास त्यांनीच घडवून आणला. मी केवळ मंत्रालयातून मंजुरी आणली. बंटी मासुळे हे तुमच्या प्रभागातील हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यासह भाजपाच्या उमेदवारांना निवडुन द्या असे आवाहन आ.अनुप अग्रवाल यांनी केले.

तर गेल्या सहा वर्षांपासून मिल परिसरातील जनतेला हक्काचा सातबारा मिळावा यासाठी मी प्रयत्न करत होतो.माझा पाठपुरावा निश्चित होता. परंतु विषय तडीस नेण्यासाठी पाठबळाची गरज होती. ते पाठबळ आ.अनुपभैय्यांनी दिले. त्यांच्यामुळेच मिल परिसरातील रहिवाशांना हक्काचा सातबारा मिळाला असे म्हणत माजी नगरसेवक तथा भाजपाचे पूर्व मंडल अध्यक्ष अमोल मासुळे यांनी आ.अनुपभैय्यांचे मिल परिसरातील जनतेच्या वतीने आभार मानले. त्यांना धन्यवाद दिले.

गेल्या 30-40 वर्षांपासून भिजत पडलेला मिल परिसरातील रहिवाशांच्या घरांच्या सातबाराचा प्रश्न आमदार अनुपभैय्या यांच्यामुळे सुटल्याने त्यांचा मिल परिसरातील रहिवाशांच्यावतीने अमोल मासुळेंच्या नेतृत्वात भव्य सत्कार करण्यात आला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अनुपभैय्या म्हणाले की, तुमच्या घरांना सातबारा मिळण्याचे पक्के झाल्याने जेव्हढा आनंद तुम्हाला झाला आहे, तेव्हढाच आनंद मला देखील झाला आहे. कारण मी मिल परिसरातून लहानाचा मोठा झालो आहे. येथील जनतेच्या सुखदुःखाची मला जाणीव आहे. त्यांना हक्काचा सातबारा मिळणे किती आवश्यक आहे. याची मला जाण आहे. मिल परिसरातील रहिवाशांना हक्काचा सताबारा मिळावा यासाठी बंटी मासुळेंनी प्रयत्न केले. महापालिकेत ठराव करण्यात आला. कागदपत्रे नाशिक,पुणे मार्गे मुंबईपर्यंत नेण्याचे काम मासुळेंनी केले. पुण्यात सातबारा मिळविण्यासाठी मंजुरी घेवून ती कागदपत्रे मंत्रालयात आणली. सर्व काम बंटीनेच केले. मी फक्त मंत्रालयातून मंजुर करुन आणले. आपण धुळ्यातील रहिवाशांना हक्काचा सातबारा देत आहोत, नगावबारी भागात 650 तर गवळी वाड्यातील 300 घरांना हक्काचा सातबारा दिला. मिल परिसरातील अडिच हजार घरांना येत्या महिन्या दीड महिन्यात नक्कीच हक्काचा सातबारा मिळेल. कुठलेही काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असते. आधीच्या आमदारांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केले असतील. परंतु माझे काम करण्याची शैली वेगळी आहे. चांगलं काम करीत राहणार आहे. रावेर एमआयडीसीसाठी 2 हजार एकर जागा लवकरच मिळणार आहे. मिल परिसरापासून ती जागा जवळ आहे.त्यामुळे येथील तरुणांना त्याचा फायदा होईल. या 2 हजार एकर जागेमध्ये साडेआठ हजार कोटीचे उद्योग येतील. त्यातून मिल परिसरासह धुळ्यातील बेरोजगारांना काम मिळेल. चितोड रोडवरील 28 नंबर शाळेचा कायापालट होणार आहे. याठिकाणी क्रिडा संकुल, व्यापारी संकुल आणि सुसज्ज शाळा उभारली जाणार आहे. या मागची संकल्पना बंटी मासुळेंचीच आहे. आजपर्यंत आपण 10 हजार कामगांराना भांडी वाटप केली. सरकार गरीबांसाठी योजना तयार करते, पंरतु याआधी त्या लोकांपर्यंत पोहचत नव्हत्या. म्हणून येत्या काही दिवसा सरकारी योजनांची पुस्तीका मी घरोघरी पोहचविणार आहे. ए.बी.फौंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. येत्या 4 महिन्यात बंटीसाठी मी मतं मागायला येणार आहे. त्यावेळी बंटीसह भाजपाच्या नगरसेवकांना निवडून द्या असे आवाहन आमदार अनुपभैय्यांनी केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक बंटी मासुळे म्हणाले की, माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला आमदार अनुपभैय्यांनी बळ दिले. त्यामुळेच सातबारा प्रश्न सुटला म्हणून मी आणि मिल परिसरातील जनता भैय्या साहेबांचे आभार मानायला आलो आहे, त्यांना धन्यवाद द्यायला आलो आहे. गेल्या 7-8 वर्षांपासून मी सातबारा प्रश्नी पाठपुरावा सुरु केला होता. नगरसेवकपदाच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रवादीत असताना हा प्रश्न तत्कालीन आयुक्तांपुढे मांडला, परंतु बघतो, करतो यात संबंधीतांनी वेळ मारुन नेली. महापौर प्रतिभा चौधरी यांच्या कार्यकाळात आ. अनुपभैय्यांच्या सुचनेवरुन महासभेत सातबार्‍याचा विषय मांडला. ठराव मंजुर झाला. 2023 मध्ये नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतरदेखील पाठपुरावा सुरु होता. अनुपभैय्या आमदार नसतानाही मार्गदर्शन मिळत होते. माझ्याकडून पाठपुरावा सुरु होता. अनुपभैय्या आमदार झाले. पुन्हा कागदपत्रांची गती वाढविण्यात आली. 6-7 महिन्यात हा प्रश्न मार्गी लावणार असा शब्द आ.अनुपभैय्यांनी दिला. आ. भैय्यांनी शब्द पाळला. नगरविकास खात्याचे राज्यमंंत्री मिसाळ यांच्यासोेबत बैठक घेवून अनुपभैय्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. यावेळी सुनील पाटील,गणेश गायकवाड, शाहीर गंभीर महाराज बोरसे, वाल्मीक जाधव, भगवान कुंभार यांनी मनोगत व्यक्त करत अनुपभैय्या, मासुळेंचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *