धुळे शहर
धुळे शहरातील मालमत्ताधारकांवर लादण्यात आलेली बेसुमार घरपट्टी कमी करण्यात यावी, अस्वच्छता आणि शहरातील काही भागात होणार्या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल संवेदनशीलता बाळगावी यासह नागरीकांच्या विविध समस्या मांडण्यासठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने धुळे महापालिकेच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करीत लक्ष वेधले.
धुळे महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून राजकीय चुणूक दाखवणारे माजी आमदार शरद पाटील सुनील नेरकर आणि श्याम सनेर यांनी पहिलेच लक्षवेधी आंदोलन करत धुळ्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केल्याचे म्हटले जात आहे.
धुळे महापालिका प्रशासन नागरीकांच्या कोणत्याही समस्या सोडवत नसून कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करीत तसा प्रतिकात्मक देखावा तयार करुन राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार गटाच्या वतीने धुळे शहरातील महाराणा प्रताप पुतळ्या पासून ढोल ताशाच्या गजरात महापालिकेवर धडक मोर्चाच काढला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरुध्द जोरदार घोषणाबाजी करुन नागरीकांचे लक्ष वेधण्यात आले.
धुळेकर नागरिकांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी तत्काळ कमी करण्यात यावी. शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणार्या सुविधांचा विचार करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी. पावसाळा सुरु होऊनही अदयाप पूर्णपणे नाले सफाई झालेली नाही. शहरातील अनेक कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत काटेरी झुडपे उगलेली आहेत. ठिकठिकाणी घाण पाण्याचे तलाव साचलेले आहेत.यासंदर्भात स्वच्छतेची मोहीम तातडीने हातात घेण्यात यावी. साथीच्या आजारापासून नागरिकांची सुटका करावी. शहरातील काही भागात होणार गढूळ पाणी पुरवठा बंद व्हावा. नियमित आणि स्वच्छ पाणी मिळावे.सध्या पावसाळ्यात विजेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. चिखल आणि घाणीचे साम्राज्य यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः रस्ता शोधत जावे लागते, म्हणून महानगर पालिकेने आवश्यक त्याठिकाणी पथ दिव्यांची संख्या वाढवावी.अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
माजी आमदार प्रा.शरद पाटील, सुनिल नेरकर, शाम सनेर, सचिन दहिते, सारांश भावसार, कुणाल पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंगे्रसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.