नवी दिल्ली
इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं जाहीररीत्या उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला असून, यामुळे जगभरात याचे पडसाद उमटले. जग तिसऱ्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकल्याचे म्हटले जाते आहे.
हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेने नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर इराणने आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही ट्रंप यांनी केलं आहे.
इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. नेतन्याहू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांचं कौतुक केलं.
अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांचा इराणनं तीव्र निषेध केला आहे. अमेरिकी सैन्यानं केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांची सनद आणि अण्वस्त्र प्रसार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणारा आहे, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सईद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. या हल्ल्याचे परिणाम दीर्घकाळ राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अमेरिकेनं हल्ला केलेल्या फोर्डो, नतांज आणि एस्फहान इथं निवासी भागात कुठलाही धोका असल्याचं किरणोत्सार प्रणाली डेटा आणि क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेलं नाही, असं इराणच्या अणुऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे. अमेरिकेचे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारे असून कायदेशीर कारवाईसह आवश्यक ती पावलं उचलली जातील. तसंच, आपले शास्त्रज्ञ अणुउद्योग विकसित करत राहतील, असं या संस्थेनं म्हटलं आहे.
इस्रायलने केलं अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं गुटेरस यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इराणच्या अध्यक्षांसोबत चर्चा
पश्चिम आशियात सुरु झालेल्या संघर्षाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष मसऊद पेझेश्कियान यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली. दोघांमधे यासंदर्भात तपशीलवार चर्चा झाली आणि पेझेश्कियान यांनी आपली भूमिका मांडली असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे.
या क्षेत्रातला तणाव कमी करणं गरजेचं असून त्याकरता संवादाचा आणि वाटाघाटींचा मार्ग स्वीकारणं या भागातल्या शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत नेहमीच शांतिस्थापनेच्या बाजूने असेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
इराणमधून भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात दिलेल्या पाठिंब्याकरता मोदी यांनी पेझेश्कियान यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी व्यापार, आर्थिक सहकार्य आणि विज्ञान तंत्रज्ञान अशा विविध मुद्यांवर चर्चा केली
लष्करी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यूनायटेड किंग्डमचे प्रधानमंत्री केयर स्टार्मर यांनी प्रादेशित स्थैर्याचं महत्त्व अधोरेखित करताना अमेरिकेच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे.
इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका असून तो धोका कमी करण्यासाठीच अमेरिकेने कारवाई केल्याचं स्टार्मर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियानंही अमेरिकेच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून इराणचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय शांततेला धोका असल्याचं म्हटलं आहे.
दुसरीकडे या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करताना फ्रान्सनं आपला या हल्ल्यांमध्ये किंवा हल्ल्यांच्या नियोजनामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. या प्रदेशात संघर्ष टाळण्यासाठी तिन्ही देशांनी संयम राखण्याचं आवाहनही फ्रान्सनं केलं आहे.
आयर्लंडचे उपप्रधानमंत्री सायमन हॅरिस यांनीही या सगळ्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघर्षामुळे धोका उद्भवेल अशी भीती सौदी अरेबियाने व्यक्त केली असून संयम बाळगावा असं आवाहन या देशांना केलं आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या तणावाचे गंभीर परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.
तर ओमाननंही अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचं हे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.