शिरपूर येथे हॉटेलवर कारवाई  दोन बालकामगारांची सुटका 

धुळे जिल्हा
सरकारी कामगार अधिकार्‍यांच्या विशेष पथकाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका बिर्याणी हाऊसवर अचानक छापा टाकला असता याठिकाणी दोन बालकामगार काम करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर दोघा मुलांना धुळ्यातील बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लहान मोठ्या व्यवसायात बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी यांच्यामार्फत एक विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. या पथकाने शिरपूर येथील करवंद नाका भागातील गितांजली हाऊस ऑफ बिर्याणी येथे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकली. त्यावेळेस दोन बालकामगार काम करताना पथकाला आढळून आले. पंचासमक्ष मुलांची सुटका करुन पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची काळजी घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळ्यातील साक्री रोडवर असलेल्या बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रकरणी सप्तश्रृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे अंतर्गत बालविवाह मुक्त भारत प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक प्रेम किसन वाकळे (वय २५) यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार मनोज देवसिंग राजपूत (रा. शिवपार्वती कॉलनी, करवंद नाका, शिरपूर) यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *