विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाला जनताच उत्तर देईल : आमदार अनुपभैया अग्रवाल
धुळे शहर
मी आमदार झाल्यापासून शहरात सुरू असलेल्या विकासकामांना विरोध करण्याचे, खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधाचे कारस्थान करत उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, मेहेरबान न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. यामुळे आता रयतेचे राजे असलेल्या छत्रपतींचे स्मारक मोठ्या उत्साहाने, दिमाखदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल. उबाठाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आता जनताच उत्तर देईल. विरोधकांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे, असे आव्हान आमदार अनुप अग्रवाल यांनी आज दिले.
शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळ सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत खासगी जागेवर हे काम होत असल्याचे व ही जागा स्मारकाच्या नावाखाली हडप करण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या याचिकेवर दोन दिवसांपूर्वी सुनावणी होऊन आज न्यायालयाने निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली. अखेर सत्याचा विजय झाला असे म्हणत भारतीय जनता पक्षातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यानंतर आमदार अग्रवाल संबोधित करताना बोलत होते.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सुनील बैसाणे, भिकन वराडे, शशी मोगलाईकर, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, मोहिनी धात्रक, किशोर चौधरी, सुबोध पाटील, कमलाकर पाटील, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, हर्ष रेलन, भगवान गवळी, पप्पू डापसे, जयेश मगर, बंटी धात्रक, रमेश करनकाळ, विनोद खेमनार, पृथ्वीराज पाटील, सचिन पाटील, पवन जाजू, सुरेश बहाळकर, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, पंकज विंचू, राकेश कुलेवार, ॲड. किशोर जाधव, जीवन शेंडगे, राजेश शहा, सागर कोडगीर, शरद बिरारी, शिवाजीराव काकडे, कैलास कासार, विकी परदेशी, रोहित चांदोडे, सुनील देवरे, सुहास अंपळकर, भीमा शर्मा, शीला भडागे, मीनल जगताप, अशोक माळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की उबाठा सेनेचे नेते स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते. या याचिकेत विविध आरोप करण्यात आले. विशेषतः मी या स्मारकाच्या ठिकाणी कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले गेले. वास्तविक, माझी स्वतःची तीन-चार कार्यालये असताना मला आणखी कार्यलायाची काय गरज? मी आजपर्यंत आमदार म्हणून नव्हे तर सालदार म्हणून काम करताना साधे शासनाच्या विश्रामगृहातही गेलो नाही. तेथे बैठका घेतल्या नाहीत. मग मी छत्रपतींच्या स्मारकाच्या नावाने इतरांसारखे माझे कार्यालय बांधण्याचे नीच कृत्य कसे करीन? स्मारकाची जागा खासगी असल्याचाही आरोप झाला. मात्र, यातही त्यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. खरे तर शहरात विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अनेक अतिक्रमणे आहेत. याबाबत यांनी कधीच आवाज काढला नाही. मात्र, जे कायदेशीर पद्धतीने छत्रपतींचे स्मारक उभारले जात आहे, त्याला विरोध करण्याचे नीच कृत्य केले गेले. स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर खालून पूर्णतः मोकळा रस्ता असणार आहे, ज्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा येणार नाही आणि अपघातही होणार नाहीत.
माझा विकासाचा रथ सुरूच ठेवणार : आमदार अग्रवाल
उबाठाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेत स्मारकाला विरोध करताना वैयक्तिक माझ्यावरही अनेक आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावर कुठलीच प्रतिक्रिया न देता माझे काम सुरूच ठेवले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांना आणखी कुठे जायचे असेल तर खुशाल जावे. विकासकामांना विरोध करावा. त्यांना आता जनताच उत्तर देईल. यापूर्वीही टॉवर गार्डनचे काम थांबविले असता त्यांना जनतेने उत्तर दिले. आताही जनताच त्यांना उत्तर देईल. माझ्या विरोधकांवर कुठलाच रोष नसून, मी शहराच्या विकासासाठी जे-जे करायचे ते काम करतच राहणार, असेही आमदार अग्रवाल म्हणाले.