धुळे जिल्हा
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे व आंतरराष्ट्रीय योग दिवस संयोजन समिती, धुळे तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कवायत मैदान, धुळे येथे शनिवार, 21 जुन, 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता योग दिन साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व विचारात घेवून प्रतिवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत सविस्तर माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार योग विषयक दिलेल्या सुचनांचे पालन करुन धुळे जिल्ह्यात योगदिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी.सी, नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यामध्ये योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शाळांनी योग दिनाचे आयोजन करावे, यासाठी योग विषयक प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्था यांचे सहकार्य घेण्यात यावे. योग विषयक प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिनाचे महत्व विचारात घेऊन चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात यावे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानात आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, शहरातील नागरीक, योग साधक व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. टिळे यांनी कळविले आहे.