धुळे जिल्हा
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोंडाईचा शहरातून चोरी झालेल्या पाच मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.याप्रकरणी तीन लाख ४५ रुपये किमतीच्या सहा मोटार सायकल व एक बुलेट अशा मुद्देमालासह एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे जिल्हयातुन चोरी होणार्या मोटार सायकल व चोरांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने पथकाने तपासाला गती दिली.
दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनीही सुरु केला होता.१४ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दोंडाईचा शहरातील नंदुरबार चौफुली येथे संशयीतरित्या थांबलेल्या खुशाल ऊर्फ दादु परमेश्वर गोसावी (वय १९ वर्षे) रा.मालपुर (ता.शिंदखेडा) यास पथकाने ताब्यात घेवून विचारपुस केली.यावेळी त्याने त्याच्या अन्य दोन फरार साथीदारांसोबत दोंडाईचा शहरातुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.यानंतर पोलिसांना चोरीच्या सातमोटार सायकल काढुन दिल्या.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, दोंडाईचा सपोनि श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, पोहेकॉ. सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, पोकॉ.विनायक खैरनार व हर्षल चौधरी, तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रविण निंबाळे, राजेंद्र ऐंडाईत, रमेश वाघ आदींनी केली.