धुळे जिल्हा
‘गुलमोहर कॅश’ प्रकरणात धुळे पोलिसांनी विश्रामगृहात ती कोट्यावधी रुपयांची रोकड कोणी आणली? याचा शोध चालवला असून सीसीटीवी मधे दिसणाऱ्या ११ इसमांची ओळख पटवली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. हे ११जण कोण? याकडे आता लक्ष लागले आहे.
धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्राम गृह येथील १०२ क्रमांकाच्या कक्षात एक कोटी ८४ लाख रुपयांची रोकड माजी आमदार अनिल गोटे यांच्या आंदोनानंतर हस्तगत करण्यात आली होती. ही रक्कम विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी जमा केली असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच समिती अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पाटील यांचे निलंबनही करण्यात आले आहे. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले असून मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. तर धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे.
यात गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीवी मधे दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी ३ पथके तयार करून धुळे आणि नंदुरबार शासकीय कार्यालयात जाऊन माहिती घेऊन आले. यातून ११ इसमांची ओळख पटवण्यात आली आहे. या सर्वांना सीसीटीवी पुन्हा दाखवून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तसेच सीसीटीवी मधे दिसणाऱ्या वाहनांपैकी ३ गाड्यांची ओळख पाठविण्यात ही पोलिसांना यश आले आहे. सोबतच दिनांक २० मे च्या रात्रीचा डंप डाटा लवकरच प्राप्त होईल असा विश्वास देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.