धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ येताच भाजपने तयारीस गती दिली आहे. धुळे जिल्हा परिषद, चार ही पंचायत समिती तसेच शिरपूर, दोंडाईचा नगर परिषद व शिंदखेडा आणि पिंपळनेर नगर पंचायत निवडणुक २०२५ करीता भारतीय जनता पक्ष धुळे जिल्हा ग्रामीण निवडणुक समिती (कोअर कमिटी) जाहिर झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे यांनी सांगितले आहे.
निवडणूक समितीमध्ये पालकमंत्री जयकुमार रावल (धुळे जिल्हा),आ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा (शिरपूर),माजी खासदार डॉ. सुभाषजी भामरे (धुळे) भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण उर्फ बापू खलाणे व आ.रामदादा भदाणे (धुळे ग्रामीण),जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.धरतीताई निखील देवरे, (महिला प्रतिनिधी) यांचा समावेश आहे.
धुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील स्वराज्य संस्थांची निवडणूक जिंकून जिल्ह्यात भाजपचा भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारकडून नुकताच प्रभाग रचनेसंदर्भातील अधिकृत टप्पानिहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर लगेचच धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे अधिकच जोरकस वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ही निवडणूक जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरवणारी ठरणार असून, प्रशासन सज्ज झाले आहे,यामुळे जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींचे गण रचना यासोबतच नगर पालिकांची प्रभाग रचना करण्यावर प्रशासनाकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
याच पार्श्वभुमिवर धुळे जिल्ह्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुध्दा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून आगामी धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शिरपूर, दोंडाईचा नगर परिषद व शिंदखेडा आणि पिंपळनेर नगर पंचायत निवडणुक २०२५ करीता भारतीय जनता पक्ष धुळे जिल्हा ग्रामीण ग्रामीण निवडणुक समिती (कोअर कमिटी) जाहिर केली आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत २०२५ निवडणुकीत भारतीय जनता पक्ष १००% यश मिळवेल भाजपाचा झेंडा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था मित्र पक्षाशी निवडणुक युती बाबत प्रदेश पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.