रविवार ठरला ‘घात वार’ ; इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून ४ जणांचा मृत्यू , केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत ७ जणांचा बळी

मुंबई

अहमदाबाद विमान दुर्घटनेने देशभर शोककळा पसरली असतानाच आज पुन्हा एकदा दोन मोठ्या दुर्घटना घडल्याने रविवार ‘घात वार’ ठरला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. तसेच केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील यवतमाळच्या वणी गावचे जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात आज तळेगाव नजीक कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. काही पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचं पथक तसंच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. या दुर्घटनेतून सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवार असल्याने या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यापैकी काही जण पुलावर उभे असतानाच पूल कोसळला आणि अनेक जण नदीत पडले.

या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.  ही दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचं सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शिवभक्त जायस्वाल कुटुंबाचे बाबा केदार नाथांच्या दर्शना वेळीच अपघाती निधन

केदारनाथच्या  गौरीकुंड सोनप्रयाग येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले राजकुमार जायस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि दोन वर्षीय मुलगी काशी अशी मृतांची नावे आहे.
12 जूनला राजकुमार सहकुटुंब व काही नातेवाईकांसह बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी वणी येथून रवाना झाले होते. दरम्यान आज त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता वणीत पोहोचली. राजकुमार जयस्वाल हे मोठे शिवभक्त म्हणून परिचित होते. गेल्या वर्षी त्यांनी वणी मध्ये मुलीच्या नामकरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध शिव कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या काशी शिव महापुराण कथेचे आयोजन केले होते. ट्रान्सपोर्ट व्यवसायातही ते नावाजलेले होते. अनेक सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान राहायचे.
या शिवभक्त जायस्वाल कुटुंबाचे बाबा केदार नाथांच्या दर्शना वेळीच अपघाती निधन झाल्याने वणीत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *