मोदी सरकारची ११ वर्षे सेवा, सुशासन
आणि ग़रीब कल्याणासाठीच समर्पित
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांची धुळ्यात पत्रकार परिषदेत
धुळे जिल्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मोदी सरकारची ११ वर्षे सेवा, सुशासन आणि ग़रीब कल्याणासाठीच समर्पित आहेत. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही ११ वर्षे असून जनकल्याणासाठी संकल्प, प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्णकाळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे. मोदी सरकारने मागच्या ११ वर्षांत केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी, असे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज धुळ्यात केले.
धुळे दौर्यावर आलेल्या मंत्री संजय सावकारे यांनी आज पत्रकार परिषदे घेत केंद्रातील मोदी सरकारच्या ११ व्या वर्षपूर्ती निमित्त केंद्र सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, सुभाष देवरे आदी उपस्थित होते.
वार्ताहरांशी संवाद साधतांना मंत्री संजय सावकारे यांनी केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देत त्यातून सामान्य जनतेचे जिवन सुकर होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले,की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करत विकासाचे युग सुरू केले आहे. भ्रष्टाचार , घोटाळे ,तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. मागच्या ११ वर्षात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रानुसार मोदी सरकारने मोठे कार्य करत विकास, अनुसंधान आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या, त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत असल्याचे संजय सावकारे यांनी नमूद केले.गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने घरे, शौचालये, गॅस जोडण्या, पेयजल, वीज, दरमहा ५ किलो धान्य ८१ कोटी जनतेला आणि ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब ,गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘अंत्योदय’ संकल्पनेनुसार, सरकारने समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या. यामध्ये ‘उज्ज्वला योजना’, ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ यांचा समावेश आहे. २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढल्याचेही मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.
महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणून मागची ११ वर्षे महिलांच्या प्रगतीचा काळ असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ३० कोटी मुद्रा योजना कर्जे ही महिला उद्योजकांना देण्यात आली.उच्च शिक्षणासाठीची महिलांची नोंदणी २८ टक्क्यांनी वाढली आहे. स्टेम कोर्सेसमध्ये मुली व महिलांच्या नोंदणीचे प्रमाण जगात सर्वोच्च म्हणजे ४३ टक्के आहे. पीएम आवास योजनेखालील ७० टक्क्यांहून अधिक घरे महिलांच्या नावे आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा करत महिलांना न्याय दिला , मातृ वंदना योजनेचा ३.९८ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे.
नवीन शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युवा वर्ग विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होऊ शकला आहे. सरकारने ११ वर्षात १७ कोटी नवीन नोकर्या निर्माण केल्या. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट, युवकांसाठी मोफत शिक्षण, १.४२ कोटींना प्रशिक्षण याचा लाभ तरूण वर्गाला होत आहे.
शेतकरी कल्याणासाठीही मोदी सरकार सातत्याने काम करत आहे. गेल्या अकरा वर्षांत पिकांच्या हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान किसानच्या अंतर्गत ११ कोटी शेतकर्यांना थेट त्यांच्या खात्यात ३.७ लाख कोटी रुपये देण्यात आले. सिंचन योजनेसाठी ९३ हजार कोटी रुपये , पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत १.७५ लाख कोटी रुपयांची मदत, कांदा, बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवणे आदी निर्णय घेतले असे ना.संजय सावकारे यांनी नमूद केले.
मोदी सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीयांना कायमच सन्मान दिला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. मोदी सरकारच्या किसान योजनेचे ८० टक्के लाभार्थी , प्रधानमंत्री आवास चे ४५ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत.
विविध शिष्यवृत्तींमध्ये ५८ टक्के तर मुद्रा योजनेत ५१ टक्के लाभार्थी एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील आहेत.मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या ११ वर्षांत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. ‘गतिशक्ती’,‘भारतमाला’, ‘सागरमाला’, ‘इंडस्ट्रियल कॉरिडोर’ यांसारख्या योजनांमुळे देशाच्या कानाकोप-यात कनेटिव्हिटी पोहोचल्याने गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. ‘वंदे भारत’ स्वदेशी गाड्या क्रांती घडवत असून, गावागावांत इंटरनेट पोहोचते आहे. कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणे, नवीन वक्फ सुधारणा कायदा तयार करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा अशी अनेक ऐतिहासिक पावले मोदी सरकारने उचलली असल्याचे संजय सावकारे यांनी पत्र परिषदेत सांगितले.