पंढरपूरी निघालेल्या वारकऱ्यांची आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी
कान्हदेश वारकरी संघातर्फे सेवाभावी उपक्रम
धुळे जिल्हा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने खान्देशातील वारकरी मजल-दरमजल करत पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे रवाना होऊ लागले आहेत. यामध्ये अनेक संत-महंतांच्या पालख्याही अग्रस्थानी आहेत. अशा विठुरायाच्या भक्तांसाठी आमदार अनुप अग्रवाल यांच्या एबी फाउंडेशन व कान्हदेश वारकरी सेवा मंडळातर्फे आज शहरात आरोग्य तपासणी शिबिराचा सेवाभावी उपक्रम झाला. यामध्ये सुमारे दोनशेहून अधिक महिला-पुरुष वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.
दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला वैष्णवांचा मेळा भरतो. यात फक्त आणि फक्त सावळ्या विठोबाच्या दर्शनाची ओढ मनात धरत खान्देशातील हजारो वारकरी दर वर्षी ऐन पावसाळ्यात शेकडो किलोमीटरची पायपीट करत रवाना होतात. ठिकठिकाणी मुक्काम करत ते मार्गस्थ होत असतात. अशा वेळी या विठूभक्तांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामनाही करावा लागतो. हीच बाब लक्षात घेत आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एबी फाउंडेशन व कान्हदेश वारकरी सेवा मंडळातर्फे आज आरोग्य तपासणी शिबिर झाले.
धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील हिंदू एकता चौकात आज सकाळी झालेल्या या शिबिरात नंदुरबार जिल्ह्यासह शिरपूर, शिंदखेडा तालुका, जळगाव जिल्ह्यातील विविध गावांतील दोनशेहून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ईसीजी, हृदय तपासणी, ताप, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, तसेच सतत चालण्यामुळे येणारी सूज, पायांना होणाऱ्या जखमा आदींवर उपचार करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश पाटील, डॉ. अनामिका सानप, डॉ. सिद्धार्थ पाटील, डॉ. सोहम मिसाळ, परिचारिका विणाली हजारे, परिचारिका वैशाली मुर्तडक यांनी तपासणी करत उपचार केले. यावेळी वारकऱ्यांना औषधांच्या कीटचेही मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी एबी फाउंडेशनच्या संचालिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते वारकऱ्यांना औषधांच्या कीटचे वाटप करण्यात आले. समन्वयक कमलेश देवरे, कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष हिरामण गवळी, सचिव सुनील वाघ, कुमार मराठे, शोभाताई खैरनार, विश्वस्त धनराज देसले, पी. एन. खैरनार, विनोद पवार, प्रकाश विभांडिक, कैलास पवार, योगिराज पाटील, यशवंत पाटील, नारायण पाटील, पप्पू शिंदे, किरण भारती, कांतिलाल सोनार, किरण पाटील, किरण माळी, डॉ. देसले, संभाजी पाटील, भगवान मराठे, विजय वाघ आदींनी संयोजन केले.
आमदार अग्रवालांसह संयोजकांना
वारकऱ्यांचे भरभरून आशीर्वाद
पायी दिंड्यांद्वारे पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकरी बांधवांसाठी आज एबी फाउंडेशनने पुढाकार घेत हा सेवाभावी उपक्रम राबविला. यातून वारकऱ्यांना जाणवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या सुटण्यास मोठी मदत मिळाली. डॉक्टरांनी आवश्यक तपासण्या करत औषधोपचारही केले. तसेच आवश्यक औषधांच्या कीटचे वितरण करण्यात आले. यामुळे महिला-पुरुष वारकऱ्यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत भरभरून आशीर्वाद दिले.