प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणामध्ये धुळ्याला `ड प्लस’ दर्जा द्यावा आमदार अनुप अग्रवाल यांची उद्योगमंत्री सामंतांकडे आग्रही मागणी


मुंबई

राज्यातील अविकसित जिल्हा म्हणून धुळे जिल्हा ओळखला जातो. विशेषतः औद्योगिक विकासाच्या बाबतीत धुळे जिल्हा खूपच पिछाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’ दर्जा द्यावा. जेणेकरून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून, उद्योगनिर्मितीसाठी पोषक स्थिती निर्माण होईल, अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली.
आमदार अग्रवाल यांनी याबाबत मंगळवारी (ता. १०) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देत धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की धुळे जिल्ह्याशेजारील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळत गेल्याने ते जिल्हे विकासाबाबत धुळ्याच्या खूपच पुढे गेले आहेत. त्या तुलनेत धुळे जिल्ह्याची मात्र नेहमीच उपेक्षा झाली. यामुळे धुळे जिल्हा आजही अविकसित म्हणून ओळखला जातो. वास्तविक, सद्यःस्थितीत धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्प, सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने उद्योगांसाठी पाणीपुरवठ्याचा विषय निकाली निघाला आहे. याशिवाय धुळे जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले गेले असून, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गतही धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील नरडाणा व धुळे शहरातील औद्योगिक वसाहतींच्या विकासाला चालना मिळू शकते. त्यासाठी शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’ दर्जा मिळाला, तर निश्चितच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून धुळे जिल्हाही प्रगतीच्या दिशेने झेपावू शकेल. यातून धुळे जिल्ह्यात उद्योगांच्या निर्मितीला चालना मिळेल. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याला नवीन औद्योगिक धोरणात `ड प्लस’ दर्जा द्यावा, सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या उद्योगांना यामध्ये सवलत द्यावी, इमर्जिंग तथा एस्पार्लेशनच्या माध्यमातून जास्तीचे अनुदान दिल्यास गुंतवणुकीच्या १२० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन देण्याबाबत विचार व्हावा, या प्रोत्साहनात एसजीएसटी, व्याजसूट आदी लाभ देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, धुळे जिल्ह्यात अतिरिक्त गुंतवणुकीसाठी प्रयत्न करावेत, आदी मागण्याही आमदार अग्रवाल यांनी केल्या.

उद्योगमंत्री सामंत यांनी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला `ड प्लस’ दर्जा देण्याबाबत आपण सकारात्मक असून, हा दर्जा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार अग्रवाल यांना दिली. तसेच या मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासनही आमदार अग्रवाल यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *