धुळे जिल्हा
गेल्यावर्षी पोलीस दलात भरती झालेले ५६ पोलिस अंमलदार आपले प्रशिक्षण पूर्ण करून आज धुळे जिल्हा पोलीस दलात सेवेत रुजू झाले. या सर्वाना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रशासकीय पूर्तता करून हजर करून घेतले. तसेच गुणवंत कर्मचार्यांचा सत्कारही केला.
धुळे जिल्हा पोलीस दलात भरती झालेल्या ५६ पोलीस अंमलदारांमध्ये ३७ पुरुष आणि १९ महिला आहेत.पुरुष अमलदारांचे लातूर तर महिलांचे प्रशिक्षण नागपूर येथे झाले आहे. ५६ अंमलदारांत तीन अभियंते तर चौघे विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत १३ जणांनी कला शाखेत पदवी घेतली आहे वाणिज्य शाखेतल्या २० पदवीधरांनीही नोकरी म्हणून अखेर पोलीस दलास पसंती दिली आहे.अन्य उमेदवारांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे.
५६ अंमलदारांपैकी ३९ जण सरळ सेवा भरतीत तर सहा जण सेवानिवृत्त झालेले जवान आहेत. क्रीडा नैपुण्याच्या आधारावर पाच जणांना संधी मिळाली आहे.अनुकंपा तत्वावर चार तर गृह रक्षक दलातल्या दोघांना आता जिल्हा पोलीस दलाची खाकी वर्दी लाभली आहे.
या सर्वांचाच आज पोलिस खात्यातला पहिला दिवस. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यासार्यांची भेट घेतली आणि त्यांना व्यसन टाळून अंगी शिस्त राखण्याचे महत्व सांगितले. आयुष्यात समतोल राखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षकांनी या नव्या पोलीस अंमलदारांपैकी काहींच्या प्रशिक्षण काळातले अनुभवही ऐकले.
पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेल्या सानिका कृष्णात चौघुले हिने वारली चित्रकलेत बक्षीस मिळविले आहे तर गायत्री संजय खैरनार हिने वॉल पेंटिंगमध्ये बक्षीस मिळविले आहे वैष्णवी प्रेमकुमार मनिखेडकर हिने तायक्वांदो या क्रीडा प्रकारातबक्षीस मिळविले आहे. या सर्वांचा यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.