मिल परिसरात जनतेच्या मनातील ड्रीम प्रोजेक्ट लवकरच साकारणार : आमदार अनुप अग्रवाल
धुळे शहर
शहरातील मिल परिसरातील नागरिकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडविणारा बंटी मासुुुळे यांच्या संकल्पनेेेतील ड्रीम प्रोजेक्ट लवकरच प्रत्यक्षात साकारला जाणार आहे. यात शाळा क्रमांक २८ च्या तीन एकर जागेवर मिनी क्रीडा संकुल, व्यापारी संकुल आणि दुमजली शाळेची उभारणी करण्यात येईल. महापालिकेच्या महासभेत या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून, येत्या दोन वर्षांत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल, तसेच त्यासाठी सर्व ती मदत, सहकार्याची ग्वाही आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.
भाजपचे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष व प्रभाग क्रमांक १७ चे माजी नगरसेवक अमोल मासुळे पाठपुरावा करत असलेल्या या प्रकल्पासाठीच्या जागेची आमदार अग्रवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली, त्या वेळी आमदार अग्रवाल बोलत होते.
यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेवक अमोल मासुळे, महापालिकेचे माजी स्थायी सभापती सुनील बैसाणे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, पुण्याचे आर्किटेक्ट आनंद खैरनार, महापालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सुनील पाटील, माजी नगरसेवक संतोष खताळ, किशोर सरगर, दिनेश गायकवाड, प्रशांत सूर्यवंशी, शशी मोगलाईकर, संदीप बैसाणे, राजेंद्र पाचपुते, प्रथमेश गांधी, चंद्रमणी खैरनार, चंद्रकांत पाटील, गोविंदा मराठे, मुकेश थोरात, युवराज पाटील, मनोज सरगर, छोटू जाधव व प्रभागाचे नागरिक उपस्थित होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाच्या माध्यमातून हातगाडीवाले व छोट्या व्यावसायिकांना हक्काचे गाळे मिळतील. पोलिस, सैन्य दलात भरतीपूर्व तयारी करणाऱ्या तरुणांना तसेच खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, परिसरातील गोरगरीब, कष्टकऱ्यांच्या पाल्यांना आधुनिक शाळेत इंग्रजी माध्यमाचे शिक्षणही घेता येईल. येत्या दोन वर्षांत मिल परिसरातील महापालिका शाळा क्रमांक २८ च्या आवारातील तीन एकर जागेवर येत्या दोन वर्षांत हा प्रकल्पा साकारला जाईल. यासाठी महापालिकेची मंजुरी मिळाली असून, माझ्यासह माजी नगरसेवक मासुळे त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. या प्रकल्पामुळे मिल परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. व्यापारी संकुलातील गाळ्यांमुळे परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल.
तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा – अमोल मासुळे
श्री. मासुळे म्हणाले, की या प्रकल्पासाठी गेली तीन-चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या प्रकल्पासाठी आमदार अनुप अग्रवाल यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. प्रकल्पांतर्गत रंगारी चाळीपासून श्रीराम एसटीडीपर्यंतच्या रस्त्यालगत सुमारे ३० ते ३५ व्यापारी गाळे उभारले जातील. या गाळ्यांमधून परिसरातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल. व्यापारी संकुलाच्या मागे मिनी स्टेडियम तयार होणार असून, त्यात व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, कुस्ती यांसारख्या खेळांचे मैदान आणि जॉगिंग ट्रॅकची सुविधा असेल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकही याचा लाभ घेऊ शकतील. या शाळेची दुमजली इमारत उभारून तेथे परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्याचाही मानसल असल्याचे श्री. मासुळे यांनी सांगितले.
“आमदार अनुप अग्रवाल यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, या प्रकल्पामुळे प्रभागातील व्यावसायिकांना गाळे, तरुणांना क्रीडा कौशल्य विकासासाठी स्टेडियम आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक शाळा मिळणार आहे.”
— अमोल मासुळे, मंडळ अध्यक्ष, भाजप, धुळे