धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा १२ वा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न

धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलीस
प्रशिक्षणार्थींचा १२ वा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते विजेत्या प्रशिक्षणार्थ्यींचा सत्कार

धुळे जिल्हा

नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीं आजपासून पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष, निर्भय आणि धैर्यशील पोलीस म्हणून समाविष्ठ होत आहे. तुम्ही समाजाचे खरे पहारेकरी असल्याने कोणत्याही प्रकारचे पक्षपाती वर्तन न करता आपली सर्वस्तरातील नागरिकांशी वागणूक न्यायपूर्ण आणि सहकार्याची असावी. असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींच्या १२ व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे सत्र क्रमांक १२ मधील ६४५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ आज ९ जून रोजी सकाळी धुळे येथील कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रांरभी प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ, दीक्षांत संचलन परेड करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपप्राचार्य राहुल फुला आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. कराळे म्हणाले की, आजच्या ६४५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत समारंभाच्या संचलनामध्ये सहभागी सर्व तेजस्वी, प्रामाणिक आणि निष्ठावान पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी आजचा दिवस हा एक दैदीप्यमान गौरवास्पद आणि अविस्मरणीय क्षण आहे. हा केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही, तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे.

आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करण्यासाठी सज्ज झाला असून कायम विद्यार्थी म्हणून चौकस रहा. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी यंत्रणाच नाही, तर समाजाच्या सुरक्षेचे व अभेद्यतेचे सशक्त आधारस्तंभ आहे. तुमच्यासाठी पोलीस वर्दी हा केवळ पोशाख नाही, तर ती जबाबदारी, निष्ठा आणि बलिदानाचे धगधगते प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार म्हणाले की, धुळे प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेले पोलीस अंमलदार, होमगार्ड व महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मुलभूत प्रशिक्षण व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. आजपावेतो नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे १२ प्रशिक्षण सत्र पूर्ण होत असून त्यात ४ हजार ३८५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी व ३ सत्रांमध्ये १ हजार ३५ होमगार्ड यांनी मुलभुत प्रशिक्षण घेतलेले आहे. ८८२ कवायत निदेशक कोर्स, इंडक्शन कोर्स अंतर्गत १ हजार ८२१ पोलीस उपनिरीक्षक तर प्रोफेशन स्किल अपग्रेडेशन अंतर्गत २ हजार ३५ प्रशिक्षणार्थीना सेवांतर्गत प्रशिक्षण असे आजपावेतो एकूण १० हजार १५८ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. १२ व्या सत्रात भारतीय न्याय संहिता-२०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-२०२३ व भारतीय साक्ष अधिनियम-२०२३ यांचे मुलभुत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीमध्ये शिस्त रुजविण्यासाठी पद व शस्त्र कवायत शिकविले असून कायदा व सुव्यवस्था, दहशतवाद व घातपात इत्यादीसारखे महत्वाचे प्रसंग हाताळणे, तसेच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी प्रशिक्षणार्थींना लाठी व शस्त्र हाताळणी, गोळीबार, कराटे, जमाव नियंत्रण आणि कमांडो यांचेही प्रशिक्षण दिले आहे.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र १२ चे विजेत्या प्रशिक्षणार्थ्यींचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात बेस्ट टर्न आऊट ऋषिकेश मठकर (सिंधुदुर्ग), आंतरवर्ग प्रथम सुर्यभान पाटील (जळगांव), बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), गोळीबार प्रथम शरद कोंड (नाशिक ग्रामीण), कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), बेस्ट ड्रील (पद व शस्त्र) जितेंद्र मोरे (मिरा भाईदर), सर्वोत्कृष्ट खेळाडू अमर क्षिरसागर (सोलापूर ग्रामीण) तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुर्यभान पाटील (जळगांव) या सर्वांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्याणी कच्छवा तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल फुला यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, प्रशिक्षणार्थ्यांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *