शहरात उद्यापासूनच फवारणीसह फॉगिंग, ॲबेटिंग सुरू करण्याच्या दिल्या सूचना
धुळे शहर
धुळे शहरातील विविध भागांत अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडून काय उपाययोजना सुरू आहेत, करोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काय तयारी सुरू आहे, अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई का थांबली आहे याचा आढावा घेतानाच शहरात कचऱ्याची समस्या कायम असून, काम न करणाऱ्या सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारा, असा आदेश आमदार अनुप अग्रवाल यांनी आज महापालिका आयुक्तांना दिला.
आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत आज सकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात सर्वच विभागांचे प्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. तीत आमदारांनी शहरवासीयांशी निगडित विविध विषयांवर आज महापालिकेचे विभागप्रमुख व अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, चेतन मंडोरे, अमोल मासुळे यांच्यासह प्रभारी आयुक्त करुणा डहाळे, सहआयुक्त किशोर सुडके, उपायुक्त निकम, उपायुक्त शोभा बाविस्कर, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, उपअभियंता चंद्रकांत उगले, नगर सचिव मनोज वाघ, डॉ. धनंजय पाटील, डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. अर्चना आगळे-पाटील, नरेंद्र बागूल, प्रकाश सोनवणे, राजेश वसावे, प्रदीप चव्हाण, कमलेश सोनवणे, लक्ष्मण पाटील, डॉ. प्रशांत मराठे, मालमत्ता अधीक्षक शिरीष जाधव, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव, प्रतीक कुंभार, चंद्रकांत जाधव, संजय मोरे आदी उपस्थित होते.
घरोघरी जाऊन फवारणी, ॲबेटिंग करा
आमदार अग्रवाल म्हणाले, की शहरात अतिसाराचे रुग्ण वाढत आहेत. त्याची कारणे काय आहेत हे तपासून त्वरित उपाययोजना कराव्यात. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिवतापाची साथ पसरू नये म्हणून आतापासूनच घरोघरी जाऊन फवारणी, ॲबेटिंग, धुरळणी आदी कार्यवाही सुरू करावी. रोज किती प्रभागांत धुरळणी, फवारणी, ॲबेटिंग झाले, याचा दैनंदिन अहवाल मला द्यावा.
करोनाविरुद्ध लढ्यासाठी सज्ज राहा
देशात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या महानगरांमध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका म्हणून आपली काय तयारी आहे, असा प्रश्न आमदार अग्रवाल यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर शहरातील पाच खासगी रुग्णालये सज्ज करण्यात आल्याची माहिती दिली. यावर आमदार अग्रवाल यांनी महापालिकेची स्वतःची काय यंत्रणा राबणार, असा प्रश्न केला. शहरातील ऑक्सिजन प्लांट तयार ठेवा, रुग्णांना विलगीकरणासाठी कक्ष उभारा, आदी सूचनाही त्यांनी केल्या.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, तो तातडीने उचलण्याची कार्यवाही करा. यासाठी महापालिकेकडे ३६ ट्रॅक्टर, ६० घंटागाड्या आहेत. या सर्व वाहनचालकांचे व त्यावरील कामगारांचे मोबाईल क्रमांक मला द्या. सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा लावा. त्याचा जीपीएस रिपोर्ट मला रोजच्या रोज द्या. शहरात कुठेही कचरा आढळला, तर स्वच्छता निरीक्षक, आरोग्याधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही आमदार अग्रवाल यांनी दिला. यावेळी त्यांनी शहरातील पेठ भागासह अन्य भागातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचाही आढावा घेत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांचे काम सुरू करू नका, अशा सूचना केल्या.
वाढीव घरपट्टी देयकांवरून संताप
शहरातील अनेक मालमत्ताधारकांना अव्वाच्या सव्वा मालमत्ता कराची बिले वाटप करण्यात आली आहेत. यात ज्याला पूर्वी तीन हजार घरपट्टी होती त्याला ६० हजारांचे बिल मिळाले आहे. शहरातील अनेक नागरिक या वाढीव बिलांमुळे त्रस्त झाले असून, ही बिले कमी करण्यासाठी महापालिकेत येरझरा घालत आहेत. तुम्ही काय नशा करून कामे करता का? याबाबत हजारो नागरिकांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने संपूर्ण मालमत्ताधारकांची वाढीव बिले तपासून रिवाइज करावीत. यावर अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मोजमाप केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर संबंधित ठेकेदाराला बैठकीतूनच दूरध्वनी करत त्वरित नव्याने मोजमाप करत सर्व मालमत्ताधारकांना सुधारित बिले देण्याची सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली. याबाबत मालमत्ताधारकांना त्वरित दिलासा न मिळाल्यास संबंधित ठेकेदारासह अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.
वृक्षारोपण मोहिमेत सर्वांना सहभागी करा
आमदार अग्रवाल यांनी यावेळी सावता माळी व्यापारी संकुल, टॉवर बगिचा आदी कामांचाही आढावा घेत सूचना केल्या. तसेच आगामी पावसाळ्यात महापालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेची माहिती घेतली. शहरातील नगावबारी टेकडीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली. यासाठी वन विभागाची आताच परवानगी घेण्याचे सूचित केले. यासाठी दर शनिवारी, रविवारी महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेत नगावबारीचा परिसर हिरवागार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शहरातील गट क्रमांक ५१० च्या १९ हेक्टर जागेवर थीम पार्क उभारण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेच्या मागणीचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई थंड का?
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई थंडावली आहे. शहरातील चाळीसगाव रोडवरील सर्व्हे क्रमांक ४३ या म्हाडाच्या जागेवरही अतिक्रमणे झाली आहेत. याशिवाय सुशी नाला, वडजाई रोड, ८० फुटी रोडही अतिक्रमणांनी व्यापले आहेत. याशिवाय अन्य भागातील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली. तसेच म्हाडाच्या ज्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत त्या जागांवरील अतिक्रमणे हटवून त्या म्हाडाच्या ताब्यात द्याव्यात. तेथे म्हाडाकडून घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. देवपूरमधील गट क्रमांक ८३ व ८५ मध्ये वृद्धाश्रमाचे काम करावयाचे आहे. त्याबाबत त्वरित कार्यवाहीच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मनपाच्या सुसज्ज रुग्णालयासाठी पाठपुरावा
शहरात महापालिकेचे स्वतःचे सुसज्ज रुग्णालय असावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. या रुग्णालयात आयसीयूसह विविध आजारांच्या रुग्णांना मोफत उपचार कसे मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोणत्या योजनेतून शासनाकडे मागणी करता येईल, याची संपूर्ण माहिती व प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशी सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली. महापालिकेच्या मालकीचे शहरात किती भूखंड आहेत, त्यावर सध्या कसले आरक्षण आहे, किती जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, याची संपूर्ण माहिती मंगळवारपर्यंत देण्याची सूचना त्यांनी केली.