संसारोपयोगी भांडीवाटपाचा घरेलू महिला कामगारांनाही लाभ द्या ; भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवारांचे
राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन
धुळे शहर
राज्य शासनातर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांड्यांसह कीटचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा राज्यातील लाखो कामगारांना लाभ मिळत आहे. या योजनेचा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फेही घरेलू कामगार महिलांनाही लाभ देण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार यांनी केली. या संदर्भात श्री. पवार यांनी भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांना निवेदन दिले. यावेळी विविध विषयांवर चर्चाही केली.
श्री. पवार यांनी सांगितले, की सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडीवाटपाचा लाभ देण्यात येत आहे. यात धुळे शहरातही भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत पाच हजारांवर इमारत व इतर बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला असून, अद्याप वाटप सुरूच आहे. हे भांडीवाटप करताना आमदार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार रोज ३०० कामगारांना फोनद्वारे सूचित करत ठराविक तारखेला बोलावण्यात येते व भांडीवाटप केले जात आहे. यात अतिशय काटेकोर नियोजनामुळे संबंधित लाभार्थ्यांना विनाअडथळा लाभ मिळत आहे. यावेळी कामगारमंत्री फुंडकर यांनी आमदार अग्रवाल व कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले.
श्री. पवार यांनी सांगितले, की बांधकाम कामगारांप्रमाणे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे गेल्या वर्षी घरेलू कामगारांनाही भांडीवाटपाचा लाभ देण्यात आला होता. मात्र, या वर्षी अद्याप त्यांना लाभ देण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. राज्यात घरेलू कामगारांची संख्याही मोठी असून, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. याबाबत आपण सकारात्मक विचार करत निर्णय घ्यावा, अशी मागणीही श्री. पवार यांच्यासह कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष भूषण पाटील, दिलीप सनेर, देवा वाघ, अंकुश बडगुजर, किशोर जाधव, सुनीता सोनार, जयेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.