धुळे शहर
लग्न समारंभासाठी रवाना झालेल्या वर पक्षाचे घर फोडून अज्ञात चोरांनी २० हजाराच्या रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केले.शहरातील जुने धुळे भागातील सुभाष नगर मध्ये कैलास यशवंत देवरे यांच्या घरी भरदुपारी ही धाडसी घरफोडी झाली.या घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांसह गुन्हे शाखेचेही तपास पथक घटनास्थळी दाखल झाले.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास यशवंत देवरे गल्ली नंबर दोन राहणार सुभाष नगर जुने धुळे. यांच्या मुलाचे चार जून रोजी नंदुरबार जिल्ह्यातील न्याहली येथे लग्न होते. यासाठी त्यांच्या नातेवाईकांसह ते न्यायाली येथे रवाना झाले होते.लग्न समारंभ आटोपून ते घरी परतले असता बंद घराचे कुलूप तुटलेले दिसले. कैलास देवरे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना कपाट उघडून कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. यामुळे त्यांनी सर्वप्रथम किमती दागिने सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी केली.
कपाटात ठेवलेली एक तोळा वजनाची गळ्यातील माळ, तीन ग्रॅम वजनाचे कानातले, एक ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, सहा अंगठ्या, दोन भार चांदीचे पायातले, सहा जोड, दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी,दंडकडे,प्रत्येकी दोन भार वजनाच्या तीन चांदीच्या साखळी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी लांबविल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
साई सैलानी मंदिराचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले असता भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरांनी हात सफाई केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरी करणार्या संशयितांचा शोध घेणे सुरु केले आहे.