जनावरांची अवैध कत्तल, मांस विक्रीसह वाढत्या अतिक्रमणांना आळा घाला; आ.अनुप अग्रवाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणे

नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या समोर आमदार अनुप अग्रवाल यांनी मांडले धुळे शहराचे वास्तव

धुळे शहर

धुळे शहरात केवळ बकरी ईदनिमित्तच नव्हे तर वर्षभर गोवंशांची हत्या करून गोमांसाची विक्री केली जाते. शहरातील विशिष्ट भाग हे कत्तलीचे हॉट स्पॉट बनले आहेत. कत्तलीनंतरची घाण नाल्यांमध्ये सोडली जात असल्याने तसेच उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीमुळे शहरवासीय दुर्गंधीने हैराण झाले आहेत. शहराला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. शांतता समित्या केवळ नावालाच उरल्या आहेत. असे अनेक प्रश्न शहरासमोर आ वासून उभे आहेत. यामुळे या प्रश्नांवर कठोर निर्णय घेण्याची गरज आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केली.


जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची आज आमदार अग्रवाल यांनी औपचारिक भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यावेळी आमदार अग्रवाल यांनी शहरातील विविध समस्यांचा ऊहापोह करताना विविध प्रश्न मांडले व ते सोडविण्यासाठी कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रशांत मोराणकर, महापालिकेच्या प्रभारी आयुक्त करुणा डहाळे, मनपाचे स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शांतता समित्यांमध्ये हवा बदल
आमदार अग्रवाल यांनी सांगितले, की शहरासह जिल्ह्यातील १७ शांतता समित्या बदलण्याची गरज आहे. समित्यांमध्ये जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग करावे. शहरातील रेल्वे क्रॉसिंगसह विविध भागांमध्ये सर्रास उघड्यावर मांस विक्री होते. वास्तविक या मांस विक्री करणाऱ्यांकडे कुठलाही शासकीय परवाना नाही. ज्याच्याकडे परवाना नाही त्यांच्यावर कारवाई करावी, त्यासाठी महापालिकेचे पथक तयार करावे.
शहराला अतिक्रमणांचा विळखा
शहरातील महापालिकेसह विविध शासकीय जागांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वास्तविक, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे महापालिकेला वर्षभरात अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर महापालिकेकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने अतिक्रमणधारकांची हिंमत वाढते आहे. शहरातील गट क्रमांक ५१० मध्ये अनधिकृत दर्गा उभा राहिला असून, त्याचे अतिक्रमण अद्याप हटविले गेलेले नाही. लँड जिहादचा हा प्रकार त्वरित थांबवावा. या जागेवर थीम पार्कचा प्रस्तावही दिलेला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी लवकरात लवकरत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

नशेच्या औषध विक्रीचा काळा बाजार
आमदार अग्रवाल यांनी नशेच्या औषध विक्रीच्या काळ्या बाजाराकडे जिल्हाधिकारी विसपुते व पोलिस अधीक्षक ढिवरे यांचे लक्ष वेधले. या अनधिकृत व्यवसायात काही विशिष्ट लोक सहभागी असून, त्यांच्याकडून समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचे काम सुरू आहे. अशा संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाईची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ड्रायपोर्टच्या विषयाला चालना द्या
शहरासह जिल्हाभरातून सुमारे १० हजार कोटींच्या मालाची निर्यात होते. यातील बहुतांश निर्यातदारांचे कार्यालय मुंबईला आहे. ते तेथून रिकामे कंटनेर धुळ्याला मागवितात व माल भरून पुन्हा मुंबईकडे नेऊन त्याला सील करणे, अबकारी विभागाकडे अन्य प्रक्रिया होते. त्याऐवजी धुळे शहरातच ड्रायपोर्ट निर्माण झाल्यास या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे. त्यासाठी या विषयाला चालना द्यावी, तसेच जिल्ह्यातील उद्योगांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, महापालिका निवडणुकीपूर्वी बोगस मतदारांची नावे मतदारयादीतून वगळावीत, शहरातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज दिवसेंदिवस वाढत असून, या विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे, आदी मागण्याही आमदार अग्रवाल यांनी केल्या.

ईअर टॅग, दाखल्यांमध्ये गैरव्यवहार
कुठल्याही शेतकऱ्यासह जनावर मालकाने जनावरे विक्रीसाठी आणताना त्यांना ईअर टॅग लावणे बंधनकारक आहे. मात्र, धुळे बाजार समितीसह सर्वत्र विनाईअर टॅग जनावरांची अवैध विक्री होत आहे. यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. ईअर टॅगची पडताळणी करणारी यंत्रणा नाही. पशुसंवर्धन विभागाकडूनही काहीच कारवाई होत नाही. उलट पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधितांकडून बनावट ईअर टॅग व दाखले दिले जात असून, यात लाखोंचा गैरव्यवहार होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालून प्रत्येक विक्री होणाऱ्या जनावराला ईअर टॅग बंधनकारक करावा, त्यासाठी यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी विसपुते यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *