गुलमोहर कॅश प्रकरणातील ’देणगीदार’ होणार उघड !

माजी आ.अनिल गोटे यांनी केला पत्रकातून नवा खुलासा

धुळे शहर

येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल १ कोटी ८४ लाखांच्या रोकडनंतर हळूहळू या प्रकरणातील ’देणगीदार’ समोर येवु लागले आहेत. रेशन दुकानदार, वनविभाग, महापालिका, बांधकाम खाते, जिल्हा रुग्णालय आणि आरटीओकडून कोट्यवधींची रक्कम समितीकडे दिल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि माजी आ.अनिल गोटे यांनी केला आहे.

याप्रकरणात पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबानंतर गोटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही प्रतिक्रिया दिली आहे. गोटेंनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी १० हजार रुपये उकळून एकूण १.४७ कोटी रुपये गोळा करण्यात आले. त्या पिशवीवर आर लिहिलेले होते. यातील फक्त १ कोटी रुपये समितीकडे पोहोचवण्यात आले असून उर्वरित ४७ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात त्याच्याकडे आलेल्या एक लेखी पत्राचाही त्यांनी उल्लेख केला आहे. गोटेंनी पोलीस तपासावरही जोरदार टीका केली. गुलमोहरमधील चौकशीवेळी पोलिसांकडे आधीच नोटा मोजण्याचं यंत्र आणि इलेक्ट्रिक कटर कसे होते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. वन खात्याचे ३० लाख, महापालिकेचे ९० लाख, बांधकाम खात्याचे ५० लाख, जिल्हा रूग्णालयाचे १५ लाख आणि आरटीओचे तब्बल १.५ कोटींचे कथित योगदानही माजी आ. गोटे यांनी उघड केले. तसेच, जिल्हा परिषद शिक्षकांकडूनही एक हजारप्रमाणे वर्गणी गोळा झाल्याचा आरोप केला. गोटेंनी मुख्यमंत्री आणि पोलिस प्रशासनावर थेट टीका करत, हे प्रकरण महायुती सरकारने पुर्ण दडपूण टाकण्याची तयारी केल्याचा आरोपही केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *