धुळे शहर
नातु व नातीचे भामटा राजपुत या जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याकरीता कार्यालयात खेटे मारणाऱ्या वृध्दाला प्रांत अधिकारी, धुळे, संजय शिंदे, नायब तहसिलदार व कार्यालयातील कर्मचारी यांचे करीता 30 हजार रुपये लाच घेणाऱ्या खासगी पंटर वाल्मिक प्रतापसिंग झाल्टे (राजपुत) याला आज धुळे रेल्वे स्टेशन समोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
या कारवाई विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सचिन साळुंखे यांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या नातु व नातीचे भामटा राजपुत या जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याकरीता दि. १६.११.२०२४ रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज करुन सदर अर्जाची पोहच पावती घेतलेली आहे. सदर प्रकरणांस सुमारे ०६ महिन्याचा कालावधी होवुन देखील तक्रारदार यांच्या नातुंचे जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना शैक्षणिक कामासाठी वेळोवेळी अडचणी येत असल्याने जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरीता तक्रारदार व त्यांचे भाचे यांनी दि.३०.०५.२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेण्यासाठी सदर कार्यालयात गेले. परंतु ते बाहेर गेल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यावेळी त्यांना कार्यालयात पंटर वाल्मिक झाल्टे हे भेटले. त्यांनी तक्रारदार यांना उपविभागीय कार्यालयात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असुन ते त्यांच्या मार्फतीनेच पैसे घेवुन लोकांची कामे करुन देतात असे सांगुन तक्रारदार यांच्या नातुंचे “भामटा राजपुत जातीच्या प्रत्येक दाखल्याचे प्रत्येकी १५,०००/- रुपये याप्रमाणे एकुण ३०,०००/- रुपये दयावे लागतील. त्यातुन प्रांत साहेब, नायब तहसिलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी हे माझ्याकडुन सदरचे पैसे घेवुन तुमचे काम करुन देतील. ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटणार नाहीत” असे सांगितल्याची तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.०२.०७.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पंटर वाल्मिक झाल्टे (राजपुत) यांनी तक्रारदार यांच्या नातुंचे भामटा राजपुत जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, नायब तहसिलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी यांचे करीता ३०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दारा समोर पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.