धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील सोनगीर येथील अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळे ला राज्यात विशेष उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत धुळे जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेने ११ लाखांचे पारितोषिक मिळवले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ९२ शासकीय निवासी शाळांपैकी अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, सोनगीर या शाळेची राज्यात विशेष उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रथम क्रमांक जाहिर करण्यात आला.
३१ मे रोजी यशदा, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते सोनगीर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ध्रुवास राठोड, गृहपाल मनोज पाटील तसेच नियंत्रक अधिकारी संजय सैंदाणे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रधान सचिव हर्षदिप कांबळे , समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाशजी बकोरिया, महासंचालक (बार्टी) सुनिल वारे, नाशिक विभागाचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ उपस्थित होते.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. शिरसाठ हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, हा क्षण सामाजिक समतेच्या दिशेने प्रेरणादायी असून, सामाजिक न्याय विभागाच्या अधिकार्यांसोबत सखोल चर्चा करत सर्व समावेशक धोरण व प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या कार्याला नवी दिशा लाभली असून, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महत्वाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्यात. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.