धुळे जिल्हा
हळदीसाठी सासुरवाडीला निघालेल्या नववधूच्या वऱ्हाडाला नियोजित विवाहस्थळी पोहोचण्याआधीच बाल विवाह प्रतिबंध कायद्याला सामोरे जावे लागले आणि परतीची वाट धरावी लागली.यामुळे जुनवणे (ता.धुळे) येथील १६ वर्षीय बालिकेचा २५ मे, २०२५ रोजी चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथे होऊ घातलेला विवाह थांबला.
यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार जुनवणे (ता.धुळे) येथील १६ वर्षीय बालिकेचा २५ मे, २०२५ रोजी चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथे बालविवाह होणार आहे आणि बालिका व तीचे कुटुंब २४ मे २०२५ रोजी हळदीच्या कार्यक्रमासाठी दुपारी चार वाजेला चिंचगव्हाण येथे निघणार आहेत अशी माहिती २४ मे २०२५ रोजी पावणे चार वाजेला संबंधित समितीला मिळाली.
ही माहिती मिळताच बालविवाहाचे गांभीर्य लक्षात घेवून समुपदेशक वर्षा पाटील, मुकेश महिरे व संदिप पवार यांच्या माध्यमातून जुनवणे गावाचे बालविवाह प्रतिबंध अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांना या प्रकरणाविषयी माहिती देण्यात आली.
ग्रामसेवक यांनी बालिकेच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी संबंधित कुटुंब हळदीसाठी निघाले असल्याचे समजले.ग्रामसेवकाने कुटुंबाशी संपर्क करुन त्यांना अर्ध्या रस्त्यातून बोरकुंड (ता.धुळे) येथे परत बोलावले.
त्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार माहिती देऊन समज देण्यात आली. संबधित बालिकेच्या पालकांना नोटीस देऊन २६ मे २०२५ रोजी बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले.यावेळी बालकल्याण समितीने बालिकेच्या पालकांकडून बालिकेचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात आले.
यासंदर्भात नाशिक येथील समितीला कळविण्यात आले आणि त्यांच्यामार्फतही येथील बालिकेसोबत विवाह करीत असलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनाही समज देण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया करण्यात आली.
हा बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करतांना ग्रामसेवक राजेंद्र शिंदे. पोलिस पाटील जितेश वाघ, सरपंच योगेश पाटिल तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चे सुपरवायझर मुकेश महिरे, केसवर्कर संदिप पवार यांनी कामकाज पाहिले.यासाठी त्यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिष चव्हाण व चाईल्ड हेल्पलाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रतिक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
अल्पवयीन मुलीशी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. असा गुन्हा घडत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र.१०९८ वर संपर्क करा. या नंबरवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येते. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.