पांझरा काठच्या नदीबाग क्षेत्रात १०० बंदिवान क्षमतेच्या
नवीन खुल्या कारागृहासाठी शासनाकडून १५ कोटी मंजूर
आमदार अनुप अग्रवाल यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री रावल यांचे मानले आभार
धुळे शहर
धुळे शहरातील पांझरा नदीकाठावरील जिल्हा कारागृह प्रशासनाच्या ताब्यातील नदीबाग क्षेत्रातील जागेवर १०० बंदिवानांच्या क्षमतेच्या खुल्या कारागृहासाठी राज्य शासनाने १५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री रावल यांचे आभार मानले आहेत.
विविध कामांसाठी निधीला मंजुरी
आमदारपदी निवडून आल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे शहरांतर्गत विविध विभागांसाठी इमारतींसह अन्य कामांची माहिती घेतली होती. तसेच याबाबत विविध कामांचे प्रस्तावही तयार करून घेतले. या प्रस्तावांनुसार आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री रावल यांच्यासह संबंधित मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केली. आमदार अग्रवाल यांनी यापूर्वीच धुळे शहराच्या विकासांतर्गत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत शहरातील गुरू-शिष्य स्मारक ते संतोषीमाता चौक या रस्त्याच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. याशिवाय शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामासाठीही ४६ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. आता लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे.
कारागृहाबाबत सरकारकडे पाठपुरावा
शहरातील जिल्हा कारागृह हे अतिशय जुने असून, तेथे बंदिवानांची सोय अपुरी पडते, एकूण बंदिवान आणि तेथे उपलब्ध सुविधा यामध्ये तफावत असल्याने शहरातील पांझरा काठावरील नदीबाग क्षेत्रात १०० बंदिवान क्षमतेच्या नवीन खुल्या कारागृहाचा प्रस्ताव आमदार अग्रवाल यांनी तयार करून शासनाकडे दिला होता. या कारागृहाच्या निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री रावल यांच्याकडे सतत आग्रह धरला. त्यानुसार शासनाने या कामासाठी १५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आगामी अधिवेशनात हे काम अर्थसंकल्पित होऊन निविदा प्रक्रिया पूर्णत्वास येईल.
“धुळे शहरातील प्रलंबित विविध विकासकामांचा आढावा घेऊन त्यानुसार संबंधित विभागांकडून प्रस्ताव तयार करून घेण्यात येत आहे. या प्रस्तावांनुसार शासनाकडे सातत्याने निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यात अनेक कामांसाठी निधी मिळविण्यात यशही येत आहे. या विकासकामांतून धुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
-अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर