मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने कार्य करावे – जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

 

धुळे जिल्हा

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते म्हणाल्या की, सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यात कुठेही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत नागरीकांना मदतीची आवश्यकता असते. अशावेळी प्रशासनाने अधिक सजग राहून कार्य करणे अपेक्षित आहे. विशेषत: महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी. आपत्तीच्याप्रसंगी कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घेण्याबरोबरच सर्व कार्यालय प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न, तक्रारी सोडविण्यावर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. तसेच पूर्वपरवानगीशिवाय विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांची ओळख करुन घेतली. तसेच विभागाच्या अडीअडचणी व प्रश्न् जाणून घेतले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मान्सून काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून आवश्यक औषधी साठा उपलब्ध ठेवण्याची सूचना केली.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, धुळे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगांवकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, रोहन कुवर, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे विभागपमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *