धुळे जिल्हा
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण, सटाणासह धुळे तालुका व शिंदखेडा तालुक्यातील काही ग्रामपंचायत साठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी यासाठी केंद्रीय मंत्री ना.शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला होता. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना हक्काची इमारत मिळणार आहे.
पंचायत राज संकल्पनेत ग्रामपंचायत ग्रामीण विकासाचे मूळ केंद्र असते. ग्राम अद्यापही बऱ्याच ग्रामपंचायतींना स्वतःची हक्काची इमारत नसल्याने मिळेल त्या जागेतून ग्रामपंचायतीचा कारभार हाकला जातो. तर काही ग्रामपंचायतींच्या इमारती कार्यालय जीर्ण झाल्याने कामकाज करीत असतांना स्थानिकांची प्रचंड अडचण होत असते. हे लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागणीनुसार बागलाण सटाणा परिसरासह धुळे तालुक्यातील भदाने, चिंचखेडे ,लोणखेडी, मोरदड ,उडाणे ,मोहाडी प्र.डा.,वडजाई तर शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा ,होळ, सुराय ,हातनूर, या ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी २५ लक्ष रुपये शासनाने मंजूर केले आहेत.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत संबंधित ग्रामपंचायत इमारतीसाठी विकास निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी या अभियानाचे प्रमुख केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्याकडे धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी मागणी करीत पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने निधी मंजूर केला असून सदाची योजना केंद्र शासनाची असून यात केंद्र शासनाचा ६०% व राज्य शासनाचा ४०% निधी हिस्सा आहे.आगामी काळात विकासकामे वेग घेणार असल्याची माहिती खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली आहे.