माशाची भाजी कुत्र्याने खाल्ली म्हणून क्रूरकर्मा पोराने घेतला आईचा जीव

धुळे जिल्हा

शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावाच्या ताजपुरी शिवारामध्ये  67 वर्षीय आईची तिच्याच मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण करून अमानुष हत्या केल्याची अतिशय संतापजनक घटना घडली. माशाची भाजी कुत्र्याने खाल्ली म्हणून क्रूरकर्मा पोराने आईचा जीव घेतला. या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव टिपाबाई रेबला पावरा असून त्या मूळच्या खैरकुटी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील रहिवासी होत्या. त्या आपल्या शेतात असताना, त्यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा (वय 25 वर्षे) याने तिला मारहाण करत गंभीर दुखापत केली. हल्ला इतका गंभीर होता की टिपाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, वृद्ध महिलेने जेवणासाठी मासे बनवले होते. मात्र, सदर मासे कुत्र्याने खाल्ल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी मुलगा संतप्त झाला आणि त्याने आईला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी आवलेस रेबला पावरा यास अटक करण्यात आली आहे. गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *