रिल्स तयार करुन ठकबाजी करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी केली अटक

 

धुळे जिल्हा

समाजमाध्यमावर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाने रिल्स तयार करुन लोकांची ठकबाजी करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी अखेर अटक केली आहे. यात सहा जणांना  अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली तर एकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींकडून ३ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.

धुळे तालुक्यातील हेंकळवाडी, अजनाळे या भागातील काही ठगांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन त्याद्वारे समाजमाध्यमाच्या खात्यावरुन लूट करण्याच्या उद्देशाने इंडियन सेकंड करन्सी मिलेगी असे आमिष दाखविण्यात आले. त्यात १ लाख का ७ लाख, २ लाख का १५ लाख मिलेगा अशा विविध शिर्षकाच्या रिल्स प्रसारीत करुन रिल्स लाईक केल्यावर मुद्दाम समोरच्या व्यक्तीला संपर्क केला जात होता. करन्सी दाखविण्याचा बहाणा करुन बोलविले जात होते. त्यातच आर्थिक लोभापायी आरोपीच्या जाळ्यात अडकलेल्या व्यापारी, तरुण यांना अजनाळे आणि हेंकळवाडी गावाच्या निर्जन जागेवर बोलावून हत्याराचा धाक दाखवत मारहाण करुन त्यांनी आणलेली रोख रक्कम, दागिने, मोबाईल जबरीने लुटण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हेंकलवाडी आणि अजनाळे गावाच्या रस्त्यावर लोकांना सावध करण्यासाठी मोठे फलक सुद्धा लावले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या तरुणांना अशाच टोळीने लुटले होते, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी उपअधीक्षक सागर देशमुख यांनी या प्रकरणाचा कसून तपास करीत अखेर टोळीतील प्रमुख आरोपींना जेरबंद केले आहे.

कलीम मॅनेजर भोसले (वय ३९, रा. हेंकळवाडी, ता. धुळे), शामलाल भारलाल पवार (वय ३५, रा. हॅकळवाडी, ता. धुळे), अजय राकेट भोसले (वय ३३, रा. अजनाळे, ता. धुळे), अल्पेश उगलाल भोसले (वय २५, रा. हेंकळवाडी, ता. धुळे), रामदास भारलाल पवार (वय ३७, रा. हेंकळवाडी, ता. धुळे), गोपाल गंजीधर पवार (वय २०, रा. हेंकळवाडी ता, धुळे) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याच प्रकरणातील भुऱ्या सुदाम भोसले (वय ४०, रा. अजनाळे ता. धुळे) याला विविध आजार असल्याने त्याला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सागर देशमुख व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, कृष्णा पाटील, हेड कॉन्स्टेबल कुणाल पानपाटील, उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंढे, योगेश कोळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *