मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त वडिलांनी दिली सशस्त्र सेना ध्वजनिधीस ५१ हजार रुपयांची देणगी

 

धुळे जिल्हा

धुळे शहरातील देवपूर परिसरातील रहिवासी ॲड. रमाकांत मगन पटेल यांनी मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त ५१ हजार रुपयांची देणगी ध्वज निधीस दिली आहे. जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील (नि.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

दरवर्षी ७ डिसेंबर हा दिवस ध्वजनिधी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त वर्षभर निधी संकलन केले जाते. या निधीतून सैनिक कल्याणासाठी मदत केली जाते. ही पार्श्वभूमी लक्षात घेत ॲड. पटेल (रा. ‘मेघसुंदरम’, प्लॉट क्रमांक ६४, दत्त कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी ५१ हजार रुपयांची देणगी देत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

अॅड. पटेल यांच्या मुलीचा विवाह सोहळा 20 मे, 2025 रोजी पार पडला. या समारंभात त्यांनी 51 हजार रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत स्वेच्छेने देत देशप्रेमाचा आदर्श घालून दिला. भारतीय सैनिकांचे खडतर जीवन लक्षात घेता त्यांना प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य पूर्ण करावे लागते. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी व मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सैनिक हा प्रयत्नांची पराकाष्टा करीत देशाच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असतो. या पार्श्वभूमीवर ॲड. पटेल यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या कृतीची दखल घेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर (डॉ.) पाटील यांनी त्यांना सन्मानपूर्वक पावती प्रदान केली. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच समाजातील प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत सढळ हस्ते योगदान द्यावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *