धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणाशी अंदाज समितीचा
कुठलाही संबंध नाही – आ.अजुर्न खोतकरांचा खुलासा
धुळे जिल्हा
कुठल्याही घटनेच्या तपासासाठी वेळ द्यावा लागतो, की लगेच फासावर लटकावायचे का? असा सवाल करीत विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी आज पुन्हा एकदा धुळे गुलमोहर विश्रामगृहात घडलेल्या करोडो रुपयांच्या कॅश प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमासमोर आपली भूमिका मांडली.
धुळ्यात विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी राखीव केलेल्या शासकीय विश्रामगृहातील खोलीत १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड सापडली होती. यामुळे समितीचा दौरा वादात सापडला. यासर्व आरोपांवर समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकी नंतर प्रसार माध्यमांच्या वार्ताहरांशी बोलतांना म्हणाले की, धुळे गुलमोहर विश्रामगृहात घडलेला प्रकार निंदनिय आहे. मात्र, तेथे समितीचा एकही सदस्य गेलेला नव्हता. त्यामुळे त्या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नाही, आरोप होवूनही समितीने आपले कार्य थांबविलेले नाही. आमचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. समिती जिथे जाते, तिथे असे आरोप होतच असतात. विश्रामगृहात घडलेला प्रकार निंदनिय आहे. या घटनेशी आमचा संबंध नाही. आमचा एकही सदस्य विश्रामगृहाकडे गेलेला नव्हता. वाटल्यास तेथील सीसीटीव्ही तपासावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याप्रकरणी चौकशीकरीता एसआयटीची घोषणा केली आहे. तेव्हा चौकशीतून सत्य बाहेर येईलच. कुठल्याही घटनेच्या तपासासाठी वेळ द्यावा लागतो, की लगेच फासावर लटकावायचे असते, असा सवालही आ.खोतकरांनी विचारला. तसेच समितीमध्ये शिवसेना, भाजप सोबतच कॉग्रेस आणि उभाठा सेनेचे सुद्धा आमदार आहेत, मग या आमदारांवर सुद्धा असाच आरोप करणार का? असा सवाल करीत माजी आमदार अनिल गोटे व खा.संजय राऊत यांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले.