धुळे जिल्हा
धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्राम गृहातील खोली क्र. १०२ मधून १ कोटी ८४ लाख ८४ हजार २८४ रुपयंाची रोख रक्कम पोलिसांच्या हाती लागले आहे. शिवसेना उबाठाचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी रात्री खोलीबाहेर मांडलेला ठिय्या आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर मध्यरात्री ती खोली पंचासमक्ष कुलूप तोडून उघडण्यात आली. पहाटे ४ वाजेपर्यंत ही रोख रक्कम पैसे मोजण्याच्या मशिनवर मोजण्यात येवून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. माजी आ. अनिल गोटे यांनी खोलीत करोडो रुपयांची रोकड असल्याचा केलेला आरोप खरा ठरल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी हा सर्व प्रकार भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे म्हणत सत्ताधारी भाजप आणि सत्ताधारी आमदारांनी धुळ्यात शासकीय विभागांकडून करोडोंचा मलिदा गोळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत यांच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा तसेच विकास कामांचे अंदाजपत्रक सादर करण्याकरता महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आमदारांची समिती तीन दिवसाच्या धुळे जिल्हा दौर्यावर आली आहे. येथील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात या समिती सदस्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. पैकी १०२ या क्रमांकाच्या खोलीत पाच कोटी रुपये ठेवले आहेत. हे पैसे समिती सदस्यांना देण्यासाठी ठेवण्यात आले आहेत असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. काल सायंकाळनंतर चालू झालेल्या आमदार गोटे यांच्या आरोपानंतर शहरात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. संशयास्पद खोली १५ मे पासून समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित आहे अशी माहिती गोटे यांनी दिली. गुलमोहर विश्राम गृहात माजी आमदार अनिल गोटे यांनी काल रात्री पोलीस व प्रशासनातील अधिकार्यांना धारेवर धरत संशयास्पद बंद खोलीबाहेर ठिय्या धरल्याने अखेर यंत्रणेला घटनास्थळी येणे भाग पडले. अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी इन कॅमेरा १०२ नंबरची खोली उघडली. या ठिकाणी यंत्रणेने केलेल्या तपासणीत एक कोटी ८४ लाख ८४ हजार २८४ रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही कारवाई सुरु असतांना रात्रभर अनिल गोटे सुध्दा खोली बाहेरच खुर्ची टाकून बसून होते.
यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, क्षेत्र प्रमुख भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, एडवोकेट भूषण पाटील, सलीम लंबू, चिलू आवळकंठे, निंबाजी मराठे, सुनील पाटील,राजु ढवळे, आनंद जावडेकर, डॉ.संजय पिंगळे,कपिल लिंगायत, भोला गोसावी, दिपक चुम्बन वाघ,चंद्रकांत हजारे, डॉ. सोमनाथ चौधरी, सचिन रुणवाल, अनिल शिरसाट ,अजय चौधरी, कुणाल कानकाटे ,पिनू सूर्यवंशी, मनोज जाधव, हिमांशु परदेशी, निलेश कांजरेकर, सागर निकम, सचिन रूणवाल,आबा भडांगे , पंकज भारस्कर, संदीप चौधरी, शुभम मतकर, पिंटू ठाकूर डॉ. अनिल पाटील, केतन भामरे ,मुकेश भोकरे ,रोहित भतवाल, अनिल चौधरी ,हर्षल वाणी, बंटी अहिरे, सादिक पठाण, चिलू आवळकंठे, आदी पदाधिकारी सुध्दा ठाण मांडून होते. पोलिसांनी सर्व रक्कम पंचनामा करुन ताब्यात घेतली. परंतु या घटने बाबत अद्यापही प्रशासकीय पातळीवर ठोस अशी कुठलीही कारवाई झालेली नाही.
या संदर्भात शिवसेना पदाधिकार्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टोल तसेच सोलापूर धुळे महामार्गावरील टोल व सुरत महामार्गावरील टोल वरील सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज देखील प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली, तसेच गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीव्हीचे फुटेज आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपासून तर घटनेच्या कालावधीपर्यंत म्हणजे पंचनामा पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावी अशी अशी मागणी केली असल्याची माहिती सेनेचे धिरज पाटील यांनी दिली आहे.
” तिथे संबंधितांनी केलेले आरोप निराधार आहेत, धुळे जिल्ह्यातील दौर्यानंतर आम्ही धुळे शासकीय विश्रामगृहावर गेलेलो नाही. आरोपात काहीही तथ्य नाही. उलट आमदारांच्या समितीला बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडवला तर नाही असा संशय वाटतो”.
-अर्जुन खोतकर, आमदार तथा अंदाज समितीचे अध्यक्ष